तो एक शिक्षक आहे.टोक्योतील एका शाळेत शिकवणारा.कीटकांच्या अभ्यासात रमणारा.कीटकांच्या एक दुर्मिळ प्रजातीचा शोध घेता घेता तो पोचतो एका वाळवंटी खेड्यात.सभोवताली सर्वत्र वाळूच वाळू.अचानक त्याच्या लक्षात येते की शेवटची बस निघून गेली आहे.आता रात्र इथेच काढावी लागणार आहे.निवा-याचे ठिकाण शोधत असतांना त्याची भेट गावक-यांशी होते .ते त्याला सुचवतात एक घर.वाळूच्या वाळवंटातील एका खोल खड्डयातील एक घर .ज्यात एक तरुण विधवा राहते आहे.खड्ड्यात उतरण्यासाठी चढण्यासाठी एकच व्यवस्था आहे ती म्हणजे दोरापासून बनवलेली एक कमकुवत शिडी.शिडीवरुन खाली उतरुन तो रात्र घालवतो आणि सकाळी त्याच्या लक्षात येतंय की शिडी नाहीशी झाली आहे.आणि तो कैदेत सापडला आहे.ही आहे पार्श्वभूमी Woman in the dunes या चित्रपटाची.

चित्रपट Kobo Abe या लेखिकेच्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे.कृष्ण धवल आहे.अस्तित्ववादी किंवा surrealistic म्हणता येईल अशा शैलीतला.एखाद्या अन्वयसमृद्ध रुपककथेसारखा किंवा अन्वयनाच्या अनेक शक्यता बाळगणा-या तरल भावकवितेच्या तोडीचा हा चित्रपट आहे.चित्रपट बघितल्यानंतर आपण अस्वस्थ होतोच पण आपलीच मूल्यव्यवस्था तपासायला सुरुवातही करतो.
जी एं च्या अनेक कथांमध्ये ज्याप्रमाणे नियती हे एक प्रमुख पात्र असते तसे या चित्रपटात वाळू हे नियतीचे शक्तीशाली आणि निर्दय असे प्रतिरुप आहे.वाळूचे सुरुवातीला नर्म जाणवणारे visuals नंतर नंतर भयावह वाटायला लागतात. सुरुवातीला हा शिक्षक कीटक पकडतांना वाळूतून घसरत जाणाऱ्या कीड्यांची काही दृश्ये आपण पाहतो ..वाळूच्या भोव-यात पुनःपुन्हा ते गडप होत जातात .मात्र नंतर कैदेत सापडल्यावर त्याने केलेले सुटकेचे प्रयत्न विफल होत जातात किड्यामुंगीसारखा तो वाळूत मुरतो आणि अटळपणे परिवेशाशी अनुकूलन साधतो अगदी कीटकांप्रमाणे.
उरीपोटी जपलेल्या श्रेयस आणि प्रेयस यांची मोडतोड नियती निर्दयपणे कशी करते हेही आपण अनुभवतो.कीटकाची दुर्मिळ प्रजाती शोधण्याला आपल्या आयुष्याचा साफल्यबिंदू मानणाऱ्या शिक्षकाला बादलीभर पाणी वाळूतून उपसणे हे प्रेयस वाटू लागते,तिथपर्यंतचा त्याचा प्रवास पाहतांना प्रत्येकाला आपल्या आणि त्या चित्रपटनायकाच्या आयुष्यातील साधर्म्यस्थळे जाणवायला सुरुवात होते.त्या विधवेबरोबर वाळूचे ढिगारे उपसतांना तो तिला म्हणतो Are you raking the sand to live or living to rake the sand? हा प्रश्न आपणही नकळतपणे स्वतःला विचारतो.
(पावसाच्या नजरकैदेत सापडल्यावर परवा काळपट रविवारी हा चित्रपट दुसऱ्यांदा पाहिला जरुर बघा)

अभिजित कदम

Comments

Post a Comment